मधुमिता - एक भयकथा - भाग १
अविनाश, रोहित, सायली, पूर्वा, जगदीश, सीमा आणि अद्वैत्य हे सातजण अगदी लहानपणासूनच मित्रमैत्रिणी.... अगदी "लंगोटी मित्रच" म्हणतात ना!!! अगदी तसेच.... शाळेत आणि कॉलेजमध्येही शिकायला एकत्रच होते.... एकाच कॉलनीत राहत असल्याने त्यांच्या दंग्याने सर्व आजूबाजूचा परिसर अगदी दणाणून निघायचा.... ह्यांची मैत्री म्हणजे अगदी गल्लीबोळात फेमस होती..... कधी ग्रुपमध्ये कोणावर काही प्रसंग ओढवला तरी ते सर्वजण एकमेकांच्या मदतीला धावणार.... तसेच गल्लीत गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, इत्तर काही कार्यक्रम असले तर त्यात हे सर्वजण पुढे असायचे....
अविनाश हा अत्यंत श्रीमंत आणि राजकारणी घरात जन्मलेला... त्याचे बाबा आणि काकांचा मोठा बिझिनेस होता कपड्यांचा... ते कामानिमित्त स्वतःचे गाव सोडून शहरात येऊन वसलेले.... अविनाशचे आजोबा गावाचे माजी सरपंच तर... काकाही सोसायटीचे चेअरमन होते.... त्यांच्या आजूबाजूला लोकांची सतत गर्दी होती... त्यांचा दराराही गावात होता, त्यामुळे गावातले लोक त्यांना जरा घाबरूनच असायचे.... गावामध्ये त्यांचे जमीन, शेती, जुना वाडा, फार्म हाऊस त्याला लागूनच गेस्ट हाऊस अशी संपत्ती होती.... काकांचे सेक्रेटरी व मनोहर काका हे दोघे तेथील सर्व सांभाळत होते.... रोहितचे वडील प्राध्यापक होते.... सायलीचे वडील सरकारी हुद्द्यावर काम करायचे.... तर पूर्वा, सीमा आणि जगदीशच्या वडिलांचे छोटे मोठे उद्योगधंदे होते.... पण अद्वैत्यच्या वडिलांचा बिझिनेस काही निराळाच होता.... मांत्रिक असल्यासारखेच होते पण बाकी काही किरकोळ कामे करून घर चालवायचे.... मांत्रिक हा त्यांचा साईड बिझिनेस म्हणावा लागेल....
👇CLICK ON BELOW IMAGE FOR GETTING PRODUCTS
आता नुकतेच कॉलेजला दिवाळीची सुट्टी चालू झाली होती.... सर्वांना कुठेतरी एकत्र फिरायला जायचे होते.... पण यंदा अविनाशच्या आई बाबांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस असल्याने, अविनाशला तो खूप मोठा सेलिब्रेट करायचा होता... म्हणजे अविनाशला त्यांच्या आईबाबांना एक सरप्राईझ पार्टी द्यायची होती.... त्याने हि गोष्ट सवंगड्यांना बोलून दाखवली.... सायलीच्या डोक्यात एक कल्पना आली कि, अविनाशच्या गावाकडे अविनाशच्या मोठे फार्महाऊस आहे.... तिथे आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला तर??? ....
सायली म्हणाली कि, " आपण आईबाबांच्या सर्व मित्र मैत्रिणींना तिकडे बोलावयाचे तिथे खूप मोठी पार्टी अरेंज करूया, तसेही आपल्याला सुट्टीमध्ये गावाकडील गोष्टी ह्या विषयावर डॉक्युमेंटरी करायलाच सांगितली आहे आणि अभ्यासाचा विषय आहे म्हंटल्यावर कोणी तिकडे जायला अडवणाराही नाही. आपल्याला वाढदिवसाची तयारी हि करता येईल आणि अभ्यासही होईल." अविनाश आणि बाकी सर्वांना हि कल्पना आवडली... अजून वाढदिवसाला १ महिना अवकाश होता... सर्वांनी आपापल्या घरातील लोकांना गावाकडे अभ्यासासाठी जाणार आहेत असे सांगून घरातल्या लोकांची परवानगी मिळवली.... तिकडे जाण्यासाठी सामानाची जुळवा जुळव करायला चालू केले... कोणी टॉर्च घेतले, कोणी तिकडे सारखी लाईट जाते म्हणून मेणबत्त्या घेतल्या, कॅमेरा, मोबाइल चार्जर, अभ्यासासाठी लागणारे सर्व सामान घेतले..... अविनाशने सर्व मुलींना भडंग, चिवडा, चकली आणि टिकणारे पदार्थ घ्यायला सांगितले.... गाव जरा लहान असल्यामुळे तिथे काही मिळेल कि नाही हे सांगता येत नव्हते त्यामुळे सॉफ्ट ड्रिंक्स, वेफर्स वैगेरे घेतले.... फक्त लग्नाच्या वाढदिवशी ते बाहेरून केटरर्स, डेकोरेटर्स सांगणार होते....
आता गावाकडे जायचा दिवस उजाडला... सर्वजण आपल्या सामानासहित अगदी वेळेवर तयार होऊन बाहेर पडलेले.... अविनाशच्या स्वतःची चारचाकी गाडी होती, त्या गाडीनेच सर्वजण जाणार होते.... गाडी निघाली.... गाडी घाटातून जात होती.... नुकताच पावसाळा संपलेला होता.... धबधबे अजूनही छान पडत होते.... सर्वत्र हिरवळ पसरली होती.... मस्त मनाला लुभावणारे वातावरण होते.... हि सुट्टी अगदीच छान जाणार म्हणून मनातून सर्वजण सुखावले होते.... निसर्ग तर त्याच्या रूपाचे लावण्य दाखवत होता.... डोंगर, दऱ्यांनी हिरवाईचा साज पांघरलेला होता... निसर्गाची लोभस रूपे पाहून मुले भारावून गेली होती....
पूर्वा म्हणाली, " इतकं मस्त वातावरण बघून मला तर गाडीतून उतरून नाचावंसंच वाटतंय.... "
जगदीश म्हणाला, "खूप सुंदर वातावरण आहे रे इकडे आपण थोडे सेल्फीज, फोटोज काढूया इथे...."
अविनाश म्हणाला, " हो रे आपण आता महिनाभर इथेच आहोत, एखादा दिवस येऊ ह्या ठिकाणी फोटोशूट करायला... फोटो काढत बसला तर खूप वेळ होईल जायला.... "
गाडी जशी गावाच्या जवळ आली तशी जगदीशाला चेष्टा करण्याची लहर आली... तो अविनाशला म्हणाला, "अविनाश गावात काही हिरवळ नाही दिसत..." (म्हणजे त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता कि गावात एकही त्यांच्या वयाची मुलगी नाही दिसत)
सीमा म्हणाली, " अजून गावात आला नाही तोपर्यंत ह्याचे झाले चालू चेष्टा करायचे.... "
खरंच अविनाशने नजर टाकली, तर त्यांच्या वयाच्या मुलीचं दिसत न्हवत्या... तो विचार करू लागला कि आपण लहानपणी गावात यायचो तेव्हा आपल्या वयाच्या कितीतरी मुली आपल्यासोबत खेळायला यायच्या.... बहुतेक त्यांची लग्न झाली असतील... असे म्हणून त्याने मनातील विचार काढून टाकला....
फार्महाउस गावापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावर होते.... डोंगराखाली बांधलेले.... शेजारी फक्त अविनाशचीच शेती होती.... शेतीची आणि फार्महाऊसची देखरेख मनोहर काका करायचे.... कोणी नसेल तर रात्री ते आपल्या घरी गावात जायचे... रात्री जाताना फार्महाऊसची किल्ली ते काकांचे सेक्रेटरी विजू काकांकडे द्यायचे... मनोहर काकांना अविनाशच्या आईने आधीच फोन करून सांगितले होते कि, हे सातजण येणार आहेत राहायला, त्यांची महिन्याच्या खाणपिण्याची तयारी करून ठेवायला.... मनोहर काकांनी फार्महाऊस झाडून घेतले व स्वयंपाकाची तयारी करून ह्यांची वाट पाहू लागले....
गाडी जसजशी फार्महाऊसकडे वळाली तसतशी शांतता अगदीच गर्द होऊ लागली.... खूप सुंदर, घनदाट जंगलच होते तिथे पण चिटपाखरूही दिसत नव्हते.... नाही पक्ष्यांचा किलबिलाट, नाही प्राण्यांचा आवाज.... एकदम स्तब्ध शांतता होती तिकडे.... इतकी झाडे होती तिथे पण वातावरण जरा कोंदाटच होते तिथले.... बघता बघता फार्महाउस जवळ आले.... खरंतर तो एक जुना वाडा होता, त्यात थोडे बदल करून फार्महाऊस केले होते त्याचे.... फार्महाऊस अगदी छान, टुमदार होते.... समोर नारळाची बाग होती... चिक्कूची, आंब्यांची, चिंचांची झाडे होती... सुंदर फुलांची झाडे होती... समोर छोटे तुळशी वृंदावन होते.... तिन्ही बाजूला तुळशीची छान रोपे उगवली होती... तिच्या मंजुळांचा दरवळ अगदी वातावरणात मिसळला होता... फार्महाऊसच्या मागील बाजूला छोटासा झरा वाहत होता... तर तेथूनच थोडे दूर, महादेवाचे जुन्या काळातील मंदिर होते.... तिथे पिंडीवर गोमुखातून अखंड पाण्याच्या धारेचा अभिषेक चालू असायचा... ते पवित्र पाणी झऱ्यात मिसळायचे आणि वाहायचे....
गाडी फार्महाऊस जवळ पोहोचल्याचे मनोहर काकांना हॉर्नच्या आवाजावरून कळले व ते सामान घेण्यासाठी आतून बाहेर आले....
क्रमश.....
लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर
© Anu Swapn Blog
पुढे ह्या सर्वांसोबत काय काय घटना घडतात हे वाचण्यासाठी मधुमिता - एक भयकथा - भाग २ साठी कंमेंट करा... लाईक करा...
(टीप - वरील लेखाचे सर्व अधिकार हे लेखिकेकडे अबाधित आहेत.... जर कोणी हे लिखाण आपल्या लेखनात जसेच्या तसे वापरले तर कॉपी राईट होऊ शकते.... वरील लेखन हे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्यासाठी केले नाही... हि एक मनोरंजन कथा आहे... जरी लेखन शेअर करावयाचे असल्यास वेबसाईट लिंक सहित शेअर करावेत... ह्यातील व्यक्ती आणि कथा काल्पनिक आहेत आणि जरी ह्या कोणाच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या असतील तर तो केवळ योगायोग समजावा... धन्यवाद)
वरील मधुमिता - एक भयकथा - भाग १ आवडल्यास भाग २ साठी नक्कीच कंमेंट करा.... कंमेंट केल्यास लवकरात लवकर दुसरा भाग प्रकाशित करेन

Waiting for second part😊
ReplyDeleteThanks
ReplyDeleteछान
ReplyDeleteChan
ReplyDeleteमस्त👌👌
ReplyDelete