मधुमिता - एक भयकथा - भाग 2
पूर्वा अविनाशला म्हणाली, " काय सुंदर आहे रे तुझे फार्महाऊस..."
अविनाश पूर्वाला म्हणाला, " तुला आवडले ना, मग बस झाले..."
फार्महाऊसमध्ये जुन्या काळातील बसायला लाकडी झोपाळाही होता.... तर समोर छान जुन्या काळातील आरामदायी लाकडी खुर्चीही होती.... सर्वजण आत निघाले, इतक्यात एक भलीमोठी पाल सीमाच्या अंगावर पडली.... आणि ती घाबरून जोरात किंचाळली...
अविनाश सीमाला म्हणाला, " घाबरटच आहे कुठली, इतक्याशा पालीला पाहून कोण घाबरत होय..."
तिचा केविलवाणा चेहरा पाहून सर्वजण हसायला लागले... आतूनही फार्महाऊस तितकेच सुंदर होते.... बऱ्यापैकी सर्व वस्तू ह्या लाकडी आणि जुन्या काळातीलच होत्या.... आतील बाजूस एक मोठा हॉल, एक मोठे स्वयंपाक घर, धान्य आणि बाकीचे सामान ठेवायला एक खोली, चार मोठ्या बेडरूम्स, लाकडी जिना होता.... आणि जरा दूर मागील बाजूस बाथरूम्स आणि टॉयलेट्स होते.... त्याला लागूनच आलेल्या पाहुण्यांना राहायला दोन खोल्या होत्या.... एक विहीर होती... फार्महाऊस आणि त्यामध्ये अंतर जरा जास्तच होते... आजूबाजूला झुडपे उगवली होती.... पिंपळाचे आणि कढीपत्त्याची झाडे होती....
मनोहर काकांनी सर्वांना फ्रेश व्हायला सांगितले.... अविनाशने सर्वांना बाथरूम्स आणि टॉयलेट्स दाखविले... इतक्यात मनोहर काकांनी सर्वांना चहा टाकला.... पहिल्यांदा अविनाश बाथरूम मध्ये काही साप वैगेरे आहे का हे पाहण्यासाठी गेला, कारण आजूबाजूला शेती असल्यामुळे तिथे त्यांचा वावर असायचा... तो जसा आतमध्ये गेला, तसा त्याला एक बदल जाणवला.... बाथरूमच्या फरश्या, भिंतीवरील टाईल्स, नळ हे सर्व बदलले होते.... त्याने बाहेर आल्यानंतर ह्याबद्दल मनोहर काकांना विचारले....
मनोहर काका अविनाशला म्हणाले, " मला ह्यातील जास्त काही माहिती नाही कारण मी त्यावेळी दोन दिवस शहरात कामासाठी गेलो होतो... त्यावेळी ह्या बदलल्या गेल्या आहेत.... तुझ्या काकांचे सेक्रेटरी विजूने बदलल्या आहेत... मी त्याला विचारलं तर तो म्हणाला चोकअप झाले होते, म्हणून बाथरूम फोडायला लागले... पण मला एक कळत नाही कि कोणीच तिकडे जात नाही तर चोकअप कसे काय होऊ शकते... मी सकाळी असतो आणि हा रात्री असतो... आणि परत मी त्याला विचारणार होतो, पण पंचवीस तीस दिवस झाले, मला तो गावात दिसलाच नाही.... तुम्ही यायच्या आधी रात्री त्याच्या घरी किल्ली द्यायला गेलो होतो पण तो नव्हताच... त्याची बायको होती, ती म्हणाली कि कसलं तरी त्याच मुंबईत काम आहे म्हणून तो मुंबईला गेला आहे...."
अविनाशनेहि तो विषय डोक्यातून काढून टाकला.... काही तरी कारण असल्याशिवाय विजू काका असे बदल करणार नाही.... सर्वजण फ्रेश होऊन आले.... मनोहर काकांनी सर्वांना चहा दिला.... सर्वांनाही प्रवासाचा क्षीण आला होता... तरी पण सर्वांना डॉक्युमेंटरीची तयारी करायची होती... त्यांची चर्चा चालू झाली कि, उद्या काय काय करायचे, कुठे कुठे जायचे, वैगेरे.... ह्यामध्ये त्यांचा बराच वेळ गेला.... अजून रात्रीचे ८:३० च होत होते पण इतक्यातच बारा वाजल्यासारखे वाटत होते.... कारण बाहेर एकदम भयाण शांतता होती... रातकिड्यांचा आवाज येत होता.... अविनाशने घड्याळाकडे पाहिलं तर १:३० वाजला होता त्यात.... पण मोबाईलमध्ये पाहिलं तर अजून रात्रीचे ८:३० च झाले होते.... त्याने मनोहर काकांना विचारले घड्याळ बंद पडले आहे का????
मनोहर काका म्हणाले, " हो रे आता दहा बारा दिवस असेच चालू आहे, मी सेल घालतो आणून आणि रोज ते १:३० वाजेपर्यंत येते आणि पुन्हा बंद पडते... कदाचित आतच काहीतरी खराबी झाली असेल.... चला आता जेवून घ्या.... आणि झोप बरं"
मनोहर काकांनी जेवणाचा बेतही फक्कड केला होता... भाकऱ्या, गावरान मसाला वांग, पापड, खर्डा, बरोबर तोंडी लावायला आंब्याचं लोणचं, पातीचा कांदा, तळलेल्या मिरच्या आणि जेवण झाल्यानंतर ताक.... ह्या मुलांनाही बर्गर, पिझ्झा खाऊन कंटाळा आला होता... आणि अशा वातावरणात इतकं सुंदर जेवण मिळाल्यामुळे सर्वजण जेवणावर तुटून पडले.... सर्वजण कंटाळा आल्यामुळे झोपायला गेले... मनोहर काकांनी मुलांना एक आणि मुलींना एक अशा दोन रूम्स तयार करून दिल्या.... गाद्या घातल्या.... सर्वजण पडल्या पडल्याचं झोपी गेले.... सकाळी उठून सर्वजण परत घाटात आले, मस्त धबधब्याचा आनंद घेतला, सेल्फीज काढल्या.... गावात गावाची माहिती घ्यायला गेले.... व्हिडिओज घेतले... पण अजूनही अविनाशला गावात काहीतरी विचित्रच चाललंय असं वाटत होत.... कारण खरंच गावात जास्त मुलीचं नव्हत्या.... त्यानं तसं लोकांना विचारलंही पण लोकही सरळ उत्तर देत नव्हती... ह्या सर्वांचे गावात दोन तीन दिवस असेच गेले.... आता अमावास्याही जवळ आली होती.... त्यामुळे मनोहर काकांनी सर्वांना सूचना दिली.... कि आता रात्रीचे बाहेर पडायचं नाही.... अमावस्या जवळ आली आहे....
अविनाश म्हणाला, " काहीही काका, आम्ही असले काही मानत नाही.... आणि आताच्या युगात असे बोलणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण मानले जाते...."
मनोहर काका म्हणाले, " असू दे... पण गावाकडील लोक ह्या गोष्टी मानतात.... आणि तुमची माझ्यावर जबाबदारी आहे... त्यामुळे मी हे सर्व तुम्हाला सांगत आहे...
अविनाश मनोहर काकांना म्हणाला, " ते जाऊदे सर्व पण मला सांगा आपली मधुमिता ताई कुठे असते??"
मनोहर काका म्हणाले, " तुझ्या मधुमिता ताईचे लग्न झाले... तीन वर्षांपूर्वीच.... ती तिच्या नवऱ्याच्या घरी असते...."
अविनाश म्हणाला, " काका तिचे लग्न झाले आणि मला कसे नाही बोलावले.... मलाही बहीण नाही... आणि मी तिला आपल्या बहिणीसारखेच मानत होतो...."
मनोहर काका सांगू लागले, " अरे ती सोशल वर्किंग वरचा कसला तरी कोर्स करायला मुंबईला गेली होती... आणि तिथे तिला सुभाष नावाचा मुलगा भेटला... तो पत्रकार आहे... तिथेच तिचे प्रेमप्रकरण जुळले... पण सुभाष हा अनाथ होता... आणि त्याच्याबद्दल कुणालाच काही माहित नव्हते.... मधुमिताने हे सर्व आपल्या घरी सांगितले आणि घरच्यांनी ह्या सर्व प्रकरणाला विरोध केला... मग ह्या मुलीने परस्पर लग्न उरकून घेतले... आणि गावाची दारे तिच्यासाठी बंद झाली.... फक्त आता त्यांच्या संसाराच्या वेलीवर एक फुल फुलायला पाहिजे बघ... तीन वर्ष झाली अजून मुलबाळ काही नाही त्यांना...
जगदीश म्हणाला, "असे का हे लोक प्रेमाला का विरोध करतात हेच कळत नाही..."
मनोहर काका म्हणाले, " गावाकडील साधी भोळी लोक हि, त्यांना आपली इज्जत जास्त महत्वाची असते... "
मात्र एक सांगू, सुभाष खरंच चांगला मुलगा आहे.... त्याला परिस्थितीची जाणीव आहे... खूप जपतो मधुमिताला.... आणि मलाही भेटायला येतो.... कधी शहरात काही काम असेल तर मदत करतो.... तो म्हणत असतो कि, एकदा तरी मधुमिताच्या आई बाबांनी आम्हाला घरात घ्यावं.... माझा स्वभाव बघावा... मलाही आई वडील नाहीत, मी त्यांची काळजी घेईन... ... पण हि झाली गावाची लोक त्यांना असले काही सांगितलेलं पटत नाही... जाऊ दे!!... अगदी छान चाललंय तीच शहरात.... एक महिन्यापूर्वी आले होते गावात इकडे मला भेटायला.... पण मी जाणार होतो माझ्या कामानिमित्त शहरात... अरे त्या वीजुनी बाथरूमच्या टाईल्स बदलल्या ना त्या वेळचीच गोष्ट... मधुमिता मला असे काही सरप्राईझ देणार होती कि ते सुभाषलाही अजून माहिती नव्हते.... त्या दोघांना गावात माझ्या घरात कसे ठेवायचे म्हणून आपल्या गेस्टहाऊसची किल्ली मी मधुमिताला दिली होती... पण मी जेव्हा शहरातून परत आलो तेव्हा हि दोघेही नव्हते इथे आणि किल्लीही चुकून घेऊन गेलेत बरोबर.... मी परत फोन लावला त्यांना पण दोघांचेही फोन नाही लागत... मला वाटते कि सुभाषला काहीतरी अर्जंट काम आले असेल म्हणून परत गेली असतील शहरात... असो मी जातो आता अंधारही खूप पडायला लागला आहे आणि इकडे प्राण्यांची भीती आहे.... रात्रीचे जेवण तयार करून मनोहर काका निघून गेले....
रात्री आठच्या दरम्यान सर्वांनी जेवण केले... आणि नंतर डॉक्युमेंट्रीची तयारी करत होते... हे करता करता रात्रीचे अकरा वाजून गेल्याचेहि त्यांना नाही कळले...
आता सीमाला वॉशरूमला जायचे होते... दोन तीन दिवस एकट्याला जायला काही वाटले नाही... पण मनोहर काकांच्या बोलण्यामुळे आता जायला भीती वाटू लागली होती.... बाथरूमही बाहेर असल्यामुळे आणखी जास्तच भीती बसलेली... पण सीमाची परवा सर्वांनी घाबरट म्हणून खिल्ली उडवली होती त्यामुळे तिने स्वतःला धीर दिला... आणि ती बाहेर पडली... ती बाहेर पडली आणि फार्महाऊसमधली लाईट गेली....
क्रमश.....
लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर
© Anu Swapn Blog
पुढे ह्या सर्वांसोबत काय काय घटना घडतात हे वाचण्यासाठी मधुमिता - एक भयकथा - भाग ३ साठी कंमेंट करा... लाईक करा...
(टीप - वरील लेखाचे सर्व अधिकार हे लेखिकेकडे अबाधित आहेत.... जर कोणी हे लिखाण आपल्या लेखनात जसेच्या तसे वापरले तर कॉपी राईट होऊ शकते.... वरील लेखन हे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्यासाठी केले नाही... हि एक मनोरंजन कथा आहे... जरी लेखन शेअर करावयाचे असल्यास वेबसाईट लिंक सहित शेअर करावेत... ह्यातील व्यक्ती आणि कथा काल्पनिक आहेत आणि जरी ह्या कोणाच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या असतील तर तो केवळ योगायोग समजावा... धन्यवाद)
वरील मधुमिता - एक भयकथा - भाग 2 आवडल्यास भाग 3 साठी नक्कीच कंमेंट करा.... कंमेंट केल्यास लवकरात लवकर तिसरा भाग प्रकाशित करेन

Waiting for all parts
ReplyDelete