असा एक उनाड घन
अंबरात नभांचा समूह दाटला,
धुंद वाऱ्याचा नाद सोबती झाला,
धुक्यासावे पाऊस मनाला बिलगला,
प्रेमळ क्षणांचे पाणी ओंजळीत भरुनी गेला....
असा एक उनाड घन आला,
प्रीतीच्या जलधारा बरसवूनि गेला....
विजांच्या लखलखाट लेवूनी मेघ गरजला,
स्वछंद गारांसवे मातीत विरघळला,
श्वासात मातीचा सुगंध मिसळला,
तहानलेल्या धरतीची तृष्णा क्षमवुनी गेला....
असा एक उनाड घन आला,
प्रीतीच्या जलधारा बरसवूनि गेला....
कृष्णछायेत मधुर नभ बरसला,
व्याकुळलेल्या राधेला शाम सखा भासला,
सात्विक प्रेमाचा नवा अर्थ उमगला,
डोळ्यात साठलेल्या सुखस्वप्नांचे बांध तोडुनी गेला....
असा एक उनाड घन आला,
प्रीतीच्या जलधारा बरसवूनि गेला....
मनाला तृप्ती देऊनी पाऊस थांबला,
ढगांआडूनी सूर्यनारायण डोकावला,
सोबत इंद्रधनूच्या रंग उधळला,
भूमातेचे सुंदर रूप खुलवूनी गेला....
असा एक उनाड घन आला,
प्रीतीच्या जलधारा बरसवूनि गेला....
कवियत्री - सौ. अनुष्का हणमसागर
© Anu Swapn Blog 2020-2021

0 Comments:
Post a Comment