ANU SWAPN BLOG
  • Home
  • Home
  • Articles
  • Poems
  • Image Quotes
  • Tech and Educational
  • About Us

मराठी भाषा गौरव दिन - Marathi Bhasha Din

 March 13, 2022     article     No comments   

Marathi Rajbhasha din
Marathi Rajbhasha din shubhechha

 मराठी भाषा दिन निबंध


महाराष्ट्रात मराठीची उपेक्षा होत आहे का? कारणे, जबाबदारी आणि उपाय

         आपली मातृभाषा "मराठी"आहे. ती आपल्यासाठी अतिवंदनीय आणि प्राणप्रिय आहे. मराठी भाषा ही समुद्रासारखी विशाल आहे. वेलांटी, उकारांचा साज, काना मात्रांची सुवर्ण वस्त्रे आणि अनुस्वार, विसर्गांचे सोनेरी मुकूट परिधान करून मराठी भाषा ही प्रत्येक मराठी माणसाच्या मुखावर आणि मनावर अधिराज्य करत आहे. अमृताहूनी गोड असलेली मराठी भाषा ही महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचा अभिमान आहे. मराठी भाषेचे माधूर्य हे इत्तर भाषांपेक्षा अधिक आहे. मराठी भाषेची निर्मिती ही संस्कृतपासून आलेल्या प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. ती अतिशय प्राचीन असून संत ज्ञानेशरांपासून ते कविवर्य कुसुमाग्रंजांपर्यंत अनेक साहित्यीकांनी मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केला आहे.

         मराठीचे वर्णन करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात की,

माझ्या मराठीची बोलू कौतुके।

परी अमृतातेही पैजा जिंके।

ऐसी अक्षरे रसिके।मेळवीन।।

         अर्थात, माझ्या मराठीचा बोल मला कौतुकाचा वाटतो. अमृताशी जरी पैज लावली तरी माझ्या मराठीची अक्षरे ती पैज जिंकतील.

         तर कवी सुरेश भट यांनी नी मराठी असण्याचा अभिमान व्यक्त करताना आपल्या कवितेत खुप सुंदर शब्दांचा उपयोग केला आहे. ते लिहितात

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी।

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।

धर्म, पंथ जात एक जाणतो मराठी।

एवढया जगात माय मानतो मराठी।।

         अशी ही आपली मराठी भाषा म्हणजे विविध साहित्यांमध्ये वेगवेगळया शब्दांनी सजलेली आहे. ती घाटी, नागपूरी, कोल्हापूरी, सोलापूरी, पुणेरी अशा विविध प्रांतात विविध स्वरूपात मराठी भाषिकांच्या मुखात उच्चारण्यासाठी सज्ज असते.

महाराष्ट्रात मराठीची उपेक्षा होण्याची कारण 

         आज महाराष्ट्रातच मराठी भाषेची उपेक्षा होत आहे कारण मराठी भाषेची अवस्था ही ‘‘माय मरो आणि मावशी उरो अशी झाली आहे. इंग्रज लोक भारतात आले आणि जाताना इंग्रजी भाषेचे पिल्लू भारतात सोडून गेले. त्यामुळेच काही अंशी आपल्या महाराष्ट्रातही इंग्रजी भाषेचा अंमल राहीला. परिवर्तनाचा नियम हा प्रकृतीप्रमाणे भाषेलाही लागू पडतो.

         हल्ली मराठी भाषेच्या पेहरावाला जागोजागी इत्तर भाषांची ठिगळे लावली जातात. मराठी भाषा बोलताना त्यात हिंदी, उर्दु आणि इंग्रजी शब्दांचा उपयोग जास्त झालेला दिसतो. बोलताना सर्व भाषांची भेळमिसळ आज महाराष्ट्रात पहायला मिळते. मराठी भाषा बोलताना हिंदी व इंग्रजी शब्दांचा वापर इतका केला जातो आहे की, मराठी भाषेचे मुळ स्वरूप पालटले आहे.

         मराठीत असलेले वाक्यप्रचार, म्हणी, ओव्या, उखाणे, मंगळागौरी जागरणाची गीते, भारूडे, गोंधळात गाण्यात येणारी गीतेही लोप पावत चालली आहेत. सध्या लग्न झाल्यानंतर गोंधळ घालण्याऐवजी केक कापला जातो आणि इंग्रजी गाण्यांवर दारू पिऊन नाच आणि धिंगाना करण्यात येतो. याला कुठेना कुठे तर मराठी माणूसच जबाबदार आहे.

         जागतिकीकरणामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रत्येक तरूण हा इंग्रजी भाषेच्या अंमलाखाली आहे. तरूणांना लवकरात लवकर नोकरी मिळविण्यासाठी तसेच नोकरी धंदयाच्या दृष्टीने इंग्रजी भाषा आता जवळची वाटू लागली आहे. इंग्रजी भाषा सर्वज्ञात आणि ज्ञानभाषा असल्यामुळे तिला शैक्षणिकदृष्टया अभ्यासक्र्मांत अग्रस्थान प्राप्त झाले आहे व मराठी भाषा ही अभ्यासक्रमांतून मागे पडत आहे.

         सध्या उच्च कुटुंबांमध्ये मराठीत बोलणे म्हणजे अप्रतिष्ठीचे लक्षण मानले जाते. तसेच महाराष्ट्रातील मोठमोठया संस्थांमध्ये मुलाखतीदरम्यान इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. जर आपण महाराष्ट्रात संस्था स्थापन केली आहे आणि मराठी भाषा जाणतो तर मग इंग्रजीत मुलाखत घेणे योग्य आहे का? जर व्यावसायीक संस्थांचा व्यवहार हा महाराष्ट्रातील स्थानिक लोकांशी , शेतक-यांशी  होणार असेल तर इंग्रजीचा अट्टहास का करण्यात येतो? या मुद्दयांवरही विचार करणे गरजेचे आहे. क्वचित प्रसंगी इंग्रजी व इत्तर वेळी मराठी भाषा वापरली जावी अशी सक्ती महाराष्ट्रातील विविध संस्थांमध्ये का केली जात नाही?

         तसेच महाराष्ट्रातील बरेच पालक हे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याचा अट्टाहास का करतात? यामध्ये मराठी शाळांचे खच्चीकरण होते व इंग्रजी शाळांना प्रोत्साहन दिले जाते. यामुळे मराठी शाळा हया बंद पडायच्या मार्गावर आहेत. परप्रांतीय लोक नोकरी धंदयाच्या निमित्ताने महाराष्ट्रात येतात व इथे येवून महाराष्ट्रातील लोकांना हिंदी भाषा बोलण्यास प्रवृत्त करत आहेत. खरे तर त्यांनी महाराष्ट्रात राहून मराठी भाषा शिकणे आवष्यक आहे. 

जबाबदारी आणि उपाय

         मराठी भाषा टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न करणे आवश्यक आहे व प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रथमतः मराठी माणसाने आपण मराठी असण्याचा अभिमान बाळगावा व मराठी भाषेकडे सन्मानाने पहावे. स्वतःची मातृभाषा बोलताना कोणासही कमीपणा वाटायला नको. मराठी भाषेचा दैनंदिन जीवनात वापर वाढवावा. आपल्या महाराष्ट्रातील संत व महात्म्यांनी लिहिलेल्या साहित्याचे वाचन करणे आवश्यक आहे.

         घरामध्येही लहान मुलांवर संस्कार म्हणून त्यांच्याकडून मनाचे श्लोक , देवांची स्तोत्रे पाठ करून घ्यावीत. मराठीमधून लोककथा, महापुरूषांच्या चरित्रकथा सांगाव्यात. भगवद्गीता, रामायणासारखे ग्रंथ त्यांच्यापुढे मोठयाने वाचावेत जेणेकरून लहान मुलांना मराठी व संस्कृत भाषेचे ज्ञान होईल कारण आजकाल मुल जन्मले की, तिस-याच वर्षी त्याला इंग्रजी अंगणवाडीत नेवून बसवण्यात येते. मग मुल तरी कसे मराठी लिहायला, वाचायला शिकेल? तसेच सर्वच तांत्रिक अभ्यासक्र्मांमध्ये एकतरी मराठी विषय शिकविण्यात यावा.

         राज्यात ग्रंथालयांची व वाचनालयांची स्थिती खराब आहे. ग्रंथालयात व वाचनालयात स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी सोडले तर बाकी सर्वजणांनी पाठ फिरवली आहे. शासनाने खेडयापाडयातही ग्रंथालयांची व वाचनालयांची संख्या वाढविण्याकडे भर दिला पाहिजे. मराठी पुस्तके व ग्रंथ आपल्या महाराष्ट्राची संपत्ती आहे तिचा -हास होता कामा नये. मराठी भाषेला वाचविण्यासाठी मराठी साहित्याचे वाचन करणे आवश्यक आहे.

         मराठी शाळा, महाविद्यालयात जो शिक्षणाचा दर्जा खालावत आहे सरकारने त्याकडेही लक्ष दिले पाहिजे. ज्याप्रमाणे इंग्रजी शाळांमध्ये मुलांसाठी सर्व सुखसोयी उप्लब्ध आहेत त्याप्रमाणे मराठी शाळांमध्येही व्हायला हव्यात. परदेशात नोकरी मिळविण्यासाठी किंवा विदेशी कंपन्यांबरोबर संवाद साधण्यासाठी इंग्रजी शिकण्यास काहीही हरकत नाही पण आपल्या मराठी भाषेचा मान कमी होता कामा नये. मराठी भाषेची जी सद्यस्थिती आहे त्याकडे सर्व समाजाने सकारात्मतेने बघण्याची आवश्यकता आहे.

         मराठी भाषा नुसती वाचता बोलता येवून उपयोग नाही तर मराठी भाषा ही शास्त्रशुद्ध पद्धतीने व्याकरणासह षिकता यायला हवी. आज विदेषी लोक महाराष्ट्रात येवून मराठी भाषा शिकुन घेत आहेत. तर आज आपण मराठीचा प्रचार करण्यास का कमी पडत आहोत? या प्रश्नावरही विचार होणे गरजेचे आहे.

         शासन मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी ही समाजाची व महाराष्ट्रातील प्रत्येक नागरीकाची आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करून मराठीला जागतीक दर्जा प्राप्त करून देणे ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. मराठी भाषेचा झेंडा अटकेपार नेवून महाराष्ट्राला एका उच्च स्तरावर जागा मिळवून द्यावी. हीच विनंती. म्हणूनच म्हणते मी

 

किती वर्णावी माझ्या मराठीची महती

वाजु दे डंका तिचा सा-या जगती

 

धन्यवाद

जय हिंद, जय महाराष्ट्र

सौ. अनुष्का हणमसागर 


Marathi Bhasha Din Nibandh, marathi bhasha din shubhechha, Marathi Bhasha din message, Marathi Rajbhasha Din Nibandh, Marathi Rajbhasha Din Bhashan


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

   

  • Share This:  
Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
Newer Post Older Post Home

0 Comments:

Post a Comment

Popular Posts

  • FARMER POEM एका शेतकऱ्याचे मनोगत
  • Sad love quote / विरह
  • BEST BLOGGING NICHE 2021
  • # मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग# - horror stories in marathi
ANU SWAPN BLOG

Translate

Categories

  • article
  • International women's day 2021
  • Love Quotes in Marathi
  • poem
  • Quote
  • Tech & Educational

Blog Archive

  • May 2022 (1)
  • March 2022 (1)
  • April 2021 (1)
  • March 2021 (3)
  • February 2021 (1)
  • November 2020 (1)
  • September 2020 (5)
  • August 2020 (5)
  • July 2020 (5)
  • June 2020 (2)
  • May 2020 (8)
  • April 2020 (3)

Anu Swapn blog

This blog is created for only entertainment and knowledge purpose.
Disclaimer | Contact us | Privacy Policy | Terms of us

Copyright © ANU SWAPN BLOG | Powered by Blogger